Spread the love

पहिल्या टप्प्यात 357 शाळासाठी 110 कोटीचा निधी

राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 1957 शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी 357 शाळा दुरुस्तीसाठी 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीचे सोमवारी  (23 जून 2025)  जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात बैठक झाली. जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी  बैठकीतील विविध निर्णयांची माहिती दिली.

जिल्ह्यातील अनेक शाळांच्या  इमारती या मोडकळीस आलेले आहेत. त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाच वर्षाचा प्लॅन आखला आहे. टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषदेच्या सगळ्या प्राथमिक शाळा या दुरुस्त होणार आहेत. याशिवाय सर्व सरकारी कार्यालये सोलरयुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज बिलात मोठी बचत होणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सोयी सुविधा पासून धनगरवाडे वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या संदर्भातील अहवाल तीन महिन्यात सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केले आहेत.

सरकारने साडेसात एचपी मोटर पंपसाठी वीज बिलात माफी दिली आहे या सवलती पासून संबंधित कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी सर्व्हे करावा अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना नियोजन समितीच्या बैठकीत केल्या असे  आबिटकर यांनी सांगितले.

महापूर नियंत्रण, रस्त्यांची दुरुस्ती, कोल्हापूर शहरातील पार्किंग व वाहतूक व्यवस्था यासंदर्भात अधिकाऱ्यांना नियोजन करण्यास सांगितले आहे. तसेच रस्त्यावर पावसाचे पाणी साचू नये यासाठी गटारी व नाल्यांच्या स्वच्छतेला प्राधान्यक्रम देण्याच्या सूचना महापालिकेच्या आयुक्तांना केल्या आहेत. पत्रकार परिषदेवेळी आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी उपस्थित होते.