मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल व इराण यांच्यात भीषण युद्धाचा भडका उडाला आहे. आधी इस्रायलनं इराणमधील आण्विक तळांवर हल्ले केल्याचा दावा केला. त्यानंतर इराणनंदेखी त्याला प्रत्युत्तर दिलं. आता अमेरिकेनंही इराणमधील तीन महत्त्वाच्या आण्विक तळांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या पार्श्वभूमीवर अवघ्या जगाचं लक्ष मध्य-पूर्वेकडे लागलेलं असतानाच भारतानं मात्र या संघर्षात तटस्थ भूमिका घेतली आहे. इस्रायल किंवा इराण या दोन्हींपैकी कोणत्याही एका देशाची बाजू न घेता तणाव कमी करण्याच्याच बाजूने भारत प्रयत्नशील असल्याचं दिसत असताना सोशल मीडियावरील काही धक्कादायक पोस्ट्समुळे यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.
काय आहेत सोशल मीडिया पोस्टमधील दावे?
रविवारी पहाटे अमेरिकेनं इराणमधील तीन आण्विक तळांवर हवाई हल्ला केला. त्यानंतर रविवारी दिवसभर सोशल मीडियावर पोस्ट्सचा पाऊस पडला. यात इतर अनेक दाव्यांबरोबरच भारतानं इराणवरील हल्ल्यांसाठी अमेरिकेला आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी दिल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, इराण ही गोष्ट कधीही विसरणार नाही, असंही या पोस्ट्समध्ये नमूद करण्यात आलं होतं. मात्र, यातील बहुतेक पोस्ट्समधील मेसेज हे सारखेच असल्याचं दिसत होतं. त्यामुळे हे मेसेज विशिष्ट पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचाही संशय व्यक्त केला जात होता.
झ्घ्ँ नं मांडलं वास्तव
दरम्यान, या सोशल पोस्टबाबत पीआयबी अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं फॅक्ट चेक करून नेमकं तथ्य मांडलं आहे. पीआयबीनं हे सर्व दावे खोटे असल्याचा निष्कर्ष फॅक्ट चेकमधून मांडला आहे. ‘अनेक सोशल मीडिया अकाऊंट्सवरून भारतानं अमेरिकेला इराणवर हवाई हल्ले करण्यासाठी आपली हवाई हद्द वापरू दिल्याचे दावे केले जात आहेत. पण हे दावे खोटे आहेत. ऑपरेशन मिडनाईट हॅमरसाठी भारतीय हवाई हद्दीचा वापर करण्यात आलेला नाही. खुद्द अमेरिकन लष्कराचे प्रमुख जनरल डॅन केन यांनीच अमेरिकन विमानांचा हवाई मार्ग पत्रकार परिषदेतच स्पष्ट केला होता’, असं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. या पोस्टमध्ये पीआयबीनं अमेरिकन लष्कर प्रमुखांच्या पत्रकार परिषदेची लिंकदेखील जोडली आहे. या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आलेल्या मार्गामध्ये भारताच्या हवाई हद्दीचा समावेश नाही.
रविवारी अमेरिकेनं इराणवर हल्ले केल्यानंतर जनरल डॅन केल यांनी पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली.
”ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे इराणच्या अण्वस्त्र बनवण्याच्या सुविधांचं नुकसान करण्यासाठी नियोजित करण्यात आलं होतं. इराणमधील प्रमाणवेळेनुसार पहाटे 2 वाजून 10 मिनिटांनी फोरडो आण्विक तळावर अमेरिकन विमानांनी क्षेपणास्त्र डागलं. त्यानंतर इतर विमानांनीही त्यांच्या लक्ष्यावर अचूक क्षेपणास्त्र डागली. एकूण 14 क्षेपणास्त्र या हल्ल्यात डागण्यात आली. या हल्ल्यांमध्ये इराणच्या इसफाहान आण्विक तळावर डागलेलं टोमहॉक हे शेवटचं क्षेपणास्त्र होतं”, अशी माहिती केन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमेरिकेच्या हल्ल्याबाबत इराणची भूमिका काय?
दरम्यान, अमेरिकेने इस्रायल व इराणमधील संघर्षात पडून हल्ले करण्याच्या कृतीचा इरणनं तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अमेरिकेनं अशा प्रकारे हल्ले करणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असून इराण आपला अणुकार्यक्रम असाच चालू ठेवणार आहे, असं इराणनं स्पष्ट केलं. तसेच, आता इराण कायदेशीररीत्या अण्वस्त्रप्रसारबंदी करारातून बाहेर पडू शकतो, असंही इराणनं जाहीर केलं आहे.
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी होर्मुझ सामुद्रधुनी व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय इराणनं जाहीर केला आहे. याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
