भास्कर जाधवांनी कोकणातील समर्थकांना बोलावून घेतलं, मोठी जबाबदारी अंगावर घेतली, नाराजीबाबत स्पष्टच म्हणाले…
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा असणारे कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय हे कोणाला सांगता येत नाही. मी गोष्टी आधी करतो आणि नंतर सांगतो. मी ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही. माझ्या वक्तव्यावर कोण काही सातत्याने बोलत असेल तर त्याबाबत भाष्य करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. मी नाराज आहे, या बातम्यांमध्ये तथ्य नाही. ज्या गोष्टी माझ्या मनात नाहीत, त्यावर मी खुलासा करत नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. ते सोमवारी रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
भास्कर जाधव यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांना घरी बोलावून घेतले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी मी ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. तसेच भास्कर जाधव यांनी परस्परच आपण रत्नागिरीतील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेत असल्याची घोषणा केली. मी हीच चर्चा करण्यासाठी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना बोलावून घेतल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले. मी ही जबाबदारी नुसती अंगावर घेऊन थांबणार नाही तर पक्षाला यश मिळवून देईल, असे जाधव यांनी म्हटले. एकीकडे भास्कर जाधव हे आपण ठाकरे गटात नाराज नसल्याचे सांगत असले तरी त्यांनी परस्पर आपण रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी खांद्यावर घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे राजकीय वतुर्ळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातील माझ्या भाषणात नाराजीचा लवलेश दिसला का? मी कशाला नाराज होईन? मी ही जबाबदारी घेणार असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांशी बोलावे लागले. परस्पर एखादा निर्णय घेण्याचा किंवा घोषणा करण्याचा माझा स्वभाव नाही. मी सगळ्यांशी बोलून आणि विश्वासात घेऊन माझा निर्णय योग्य की अयोग्य, हे पडताळून पाहत आहे. त्यामुळे मी नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे भास्कर जाधव यांनी ठणकावून सांगितले. आठवेळा निवडणूक जिंकल्यावर थांबावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. मी कोणावर नाराज नाही किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं नाही. माझ्यामध्ये अजूनही लढण्याची धमक आहे आणि संघर्ष करण्याची इर्षा आहे. 2022 साली जी घटना पक्षात घडली, त्यानतंर मी मैदानात जाऊन लढतोय, हे नाराजीचे संकेत आहेत का? मी अजूनही होतो त्याचठिकाणी ठामपणे पाय रोवून उभा आहे. सातत्याने स्वत:च सर्टिफिकेट देणं, हे मला जमत नाही. मी हे करणार, ते करणार, असं मी सांगत बसत नाही. मी गोष्टी आधी करतो, मग सांगतो. नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय, हे कोणालाही सांगता येत नाही. मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी स्वत:हून अंगावर घेत आहे. मी नुसता मैदानात उतरणार नाही तर पक्षाला यश मिळवून देण्यासाठी उतरणार आहे. याला नाराजी कसे म्हणायचे, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.
