इंदूर / महान कार्य वृत्तसेवा
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर शिलाँग पोलिस आरोपींची सतत चौकशी करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी आरोपी सोनम, राज आणि त्याच्या मित्रांना न्यायालयात हजर केले होते. न्यायलयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. राजा रघुवंशीच्या हत्येची आरोपी सोनम रघुवंशीचा प्रियकर राज याने पोलिसांसमोर आपलं तोंड उघडले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमधील जोडपं राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे हनिमूनसाठी मेघालयात गेले होते. मात्र, त्या ठिकाणी राजाची हत्या सोनम आणि इतर आरोपींनी कट रचून केली. मेघालय पोलिसांनी या हत्येच्या कटाचा उलगडा केला. आता शिलाँग पोलिसांकडून या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
राजा हत्या प्रकरणात हवाला आणि काळ्या पैशाचे कनेक्शन समोर आले होते. ही माहिती समोर आल्यानंतर प्रकरणाला वेगळंच वळण मिळाले. आता या प्रकरणात सोनमचा भाऊ गोविंदवर संशयाची सुई फिरू लागली आहे. इंदूर गुन्हे शाखेने अचानक गोविंदला चौकशीसाठी बोलावले. शिलाँग पोलिस राजा हत्याकांडाचा तपास करत असले तरी, इंदूर गुन्हे शाखेने आरोपी राज कुशवाहा याला बडा बांगरडा येथील सोनमच्या दुसऱ्या गोदामातून ताब्यात घेतले. तेव्हा त्याने तेथील हवाला व्यवसायाची माहिती दिली होती.
त्यानंतर, इंदूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजच्या मोबाईलची तपासणी केली तेव्हा त्यात अनेक मोठ्या हवाला व्यापाऱ्यांशी त्याच्या संपर्काचे पुरावे देखील सापडले. मोबाईलमध्ये हवाला कोड शब्द देखील सापडले आहेत. पोलिसांनी या मुद्यावर स्वत:हून कोणताही तपास केला नाही.
काही मिनिटांत 50 हजार रुपये दिले…
दुसरीकडे, सूत्रांनुसार, जेव्हा सोनमच्या सूचनेनुसार राजचे मित्र राजाला मारण्यासाठी ट्रेनने इंदूरहून निघाले तेव्हा राजने काही मिनिटांतच त्यांच्याकडे 50 हजार रुपये आणि 2 मोबाईल फोन आणले. हे 50 हजार रुपये पिथमपूरमधील एका हवाला डीलरकडून आणले होते. शिलाँग पोलिसांचे एक पथक सध्या इंदूरमध्ये तळ ठोकून आहेत. ते सोनमच्या कुटुंबाची चौकशी करत आहेत. तथापि, शुक्रवारी शिलाँग पोलिस अधिकारी चौकशीसाठी कुठेही गेले नाहीत. ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संबंधात आहेत. शनिवारी ते पुन्हा चौकशीसाठी सोनमच्या घरी पोहोचले.
