Spread the love

भोपाळ / महान कार्य वृत्तसेवा

मध्य प्रदेशमध्ये सापाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात सर्पदंशाने अनेकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. हीच बाब लक्षात घेता, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक आगळीवेगळी योजना आखली आहे. सापाच्या दंशाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्राणिसंग्रहालयांमध्ये असलेले किंग कोब्रा साप पुन्हा जंगलात सोडण्याच्या विचार सुरू केला आहे. तसेच राज्यातील विषारी सापांची गणना करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. दरम्यान, सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असतानाही मुख्यमंत्री कोब्रा साप जंगलात सोडण्याचा विचार का करीत आहेत? सापांची जनगणना करण्यामागचे नेमके कारण काय? ते जाणून घेऊष्ठ

गेल्या वर्षी मध्य प्रदेश सरकारने कर्नाटकातील मंगळुरू येथील प्राणिसंग्रहालयातून एका वाघाच्या मोबदल्यात विषारी किंग कोब्रा साप आणला होता. वन विहार राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलेला हा साप 18 जून रोजी त्याच्या पिंजऱ्यात मृतावस्थेत आढळून आला. ही घटना मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. एकीकडे राज्यातील ग्रामीण भागात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जंगलांमध्ये विषारी कोब्रा साप सोडण्याचा विचार सुरू केला आहे.

मध्य प्रदेशात होणार सापांची गणना?

 मुख्यमंत्र्यांच्या मते, किंग कोब्रा हा साप इतर सापांचा नैसर्गिक भक्षक आहे.

 कोब्रा सापांना पुन्हा जंगलात सोडल्यामुळे विषारी सापांची संख्या नियंत्रणात राहू शकते.

 डिंडोरी जिल्ह्यात दरवर्षी सर्पदंशाने सुमारे 200 मृत्यू घडतात, असे मुख्यमंत्री यादव यांनी स्वत: नमूद केलं आहे.

 इतकंच नाही, तर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विषारी सापांची जनगणना करण्याचा निर्णयही घेतला आहे.

 कोणत्या भागात विषारी सापांचं किती प्रमाण आहे, हे जाणून घेण्यासाठी विषारी सापांच्या गणनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी नेमका काय दावा केला? मुख्यमंत्री मोहन यादव यांनी असाही दावा केलाय की, किंग कोब्रा साप जमिनीवरून रेंगाळू लागला की, इतर छोटे-मोठे विषारी साप आपापल्या बिळातून बाहेर पडतात. त्यानंतर कोब्रा या सापांची शिकार करून त्यांना फस्त करतो. ज्या भागात कोब्रा सापांची संख्या सर्वाधिक आहे, तिथे सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही कमी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षभरात कोब्रा सापांची संख्या कमी झाल्यानं डिंडोरी जिल्ह्यात सर्पदंशानं 200 नागरिकांचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.