पुणे / महान कार्य वृत्तसेवा
दौंडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या डेमू शटल ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी घडलेल्या घटनेने प्रवाशांचा थररकाप उडाला. सकाळी 7.05 वाजता दौंडहून सुटलेल्या या ट्रेनच्या एका डब्यातील शौचालयात अचानक आग भडकली. आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट हे संभाव्य कारण असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आगीने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
डेमू ट्रेनला आग लागली तेव्हा एक प्रवासी शौचालयात गेला होता. मात्र, दरवाजा लॉक झाल्यामुळे तो व्यक्ती बाहेर येऊ शकत नव्हता. काही क्षणांतच टॉयलेटमधून घनधुर धूर बाहेर यायला लागला आणि आतमधून मदतीसाठी येणारा गोंगाट ऐकू येऊ लागला. या आरडाओरडीनंतर गाडीत उपस्थित काही सतर्क प्रवाशांनी तातडीने पुढाकार घेतला आणि टॉयलेटच्या दिशेने धाव घेतली.
प्रवाशांनी मिळून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळातच त्यांनी आत अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश मिळवले. प्रसंगावधान राखत वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती तात्काळ स्टेशन मास्तर आणि रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शॉर्ट सर्किटमुळे ट्रेनमध्ये अशा प्रकारे आग लागणं ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्व यंत्रणांची तपासणी करावी आणि सुरक्षा उपाय योजावेत, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
