मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. आमिर खान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेता त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत आहे. अलिकडेच आमिर खान ‘आप की अदालत’मध्ये उपस्थित होता. इथे त्यानं पहलगाम हल्ला आणि धर्माबद्दल परखड भाष्य केलं आहे. यावेळी त्यानं मला मी मुस्लिम असल्याचा गर्व आहे, असं म्हटलं आहे. पण त्यासोबतच मी हिंदुस्थानीही आहे आणि मला गर्व आहे की, मी हिंदुस्थानी आहे, असं म्हटलं आहे.
”संपूर्ण जगानं हे समजून घेतलं पाहिजे की, सुरुवात त्यांनी केलेली. त्यांनी आमच्या लोकांना मारलं. ही काय पद्धत? हा मानवतेवर हल्लाय. त्यांनी केलेल्या कृत्याची त्यांना लाज वाटली पाहिजे. कोणताही धर्म निष्पाप लोकांना मारण्यास सांगत नाही. मी दहशतवाद्यांना मुस्लिमही मानत नाही. इस्लाममध्ये असं लिहिलंय की, तुम्ही महिलांवर हात उचलू शकत नाही, तुम्ही मुलांना मारू शकत नाही. तुम्ही कोणत्याही निष्पाप व्यक्तीला मारू शकत नाही. हे सर्व इस्लामच्या विरोधात आहे.”
”मला आपल्या सैन्याचा अभिमान आहे. जेव्हा कारगिल युद्ध झालं आणि आम्ही ते जिंकलं, तेव्हा मी एकमेव व्यक्ती होतो (माझ्या माहितीनुसार) ज्यानं कारगिलमध्ये 8 दिवस घालवले आणि मी सर्वांना (रेजिमेंट्सना) भेटलो. मी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गेलो होतो.”
आमिर खानसाठी धर्म म्हणजे चेष्ठा?
आमिर खानला प्रश्न विचारण्यात आला की, त्याच्यावर आरोप आहे की, मुस्लिम धर्माची तो खिल्ली उडवतो, चेष्ठा करतो? एकीकडे तो फिल्म्समध्ये हिंदू धर्माची चेष्ठा करतो आणि दुसरीकडे त्याच फिल्ममध्ये लव्ह जिहादला प्रमोट करतात. यावर बोलताना आमिर खान म्हणाला की, ”आमिर खान म्हणाला की, मी प्रत्येक धर्माचा सन्मान करतो. मी फिल्ममध्ये हिंदू धर्माचा अपमान केलेला नाही. मी त्या लोकांवर प्रश्न उपस्थित केले, जे धर्माच्या नावावर फायदा उठवत आहेत.”
आमिर खाननं त्याची बहीण आणि मुलीचं लग्न हिंदू धर्मात केलेलं, त्यामुळे आमिर खानला मुस्लिम सपोर्टर ट्रोल्स काफिर म्हणून संबोधतात. तसेच, गजनीपर्यंत आमिर ठीक होता, पण त्यानंतर तो विसरुन गेला की, तो एक मुस्लिम आहे. यावर उत्तर देताना आमिर खान म्हणाला की, ”असं नाही… मी मुस्लिम आहे आणि मला गर्व आहे की, मुस्लिम आहे. पण, मी हिंदुस्थानीही आहे आणि मला खूप गर्व आहे मी हिंदुस्थानी असल्याचा. दोन्ही गोष्टी आपापल्या जागेवर योग्य आहेत.”
