केदारनाथ / महान कार्य वृत्तसेवा
केदारनाथजवळील गौरीकुंड परिसरात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात पायलट राजवीर सिंह चौहान यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. जयपूर येथील रहिवासी राजवीर सिंह चौहान यांची पत्नी दीपिका देखील सैन्यात सेवा देत आहे. अपघाताच्या काही महिन्यांपूर्वीच, चौहान दाम्पत्याला जुळ्या मुलांचा जन्म झाला होता. राजवीर सिंह चौहान यांनी भारतीय सैन्यात 14 वर्षे देशाची सेवा केली. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी आर्यन एव्हिएशन कंपनीत पायलट म्हणून नवीन इनिंग सुरू केली. त्यांचे मूळ गाव दौसा जिल्ह्यातील महुआजवळ आहे. अपघाताची बातमी मिळताच चौहान कुटुंबाच्या घरी लष्कर आणि पोलिस अधिकारी, सैनिक आणि नातेवाईक पोहोचू लागले. गावात शोककळा पसरली आहे.
हा अपघात कुटुंबासाठी आणखी वेदनादायक आहे, कारण फक्त चार महिन्यांपूर्वीच राजवीरच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. राजवीरच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सध्या अपघाताची कारणे तपासली जात आहेत. अशातच आज ‘फादर्स डे’च्या दिवशीच दोन चिमुकल्या मुलांच्या वडीलांचं छत्र हरवलं. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
कॅबिनेट मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी द या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दु:खद अपघाताबद्दल पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, केदारनाथला जाताना जयपूरचे पायलट लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) राजवीर सिंग चौहान यांचे हेलिकॉप्टर अपघातात अकाली निधन अत्यंत वेदनादायक आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि या कठीण काळात कुटुंबाला शक्ती देवो. या दु:खाच्या वेळी संपूर्ण राज्य चौहान कुटुंबासोबत आहे.
रेस्क्यू पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरू आहे. अधिकृत मृतांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. आर्यन एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर यात्रेच्या हंगामात भाविकांना केदारनाथपर्यंत पोहोचवण्याची सेवा देत होते. या अपघातामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर अवघ्या तीन दिवसांत झालेली ही दुसरी हवाई दुर्घटना असल्याने हवाई सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सेवा देत होते. यात्रेच्या हंगामात हजारो भाविक हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धाम गाठत असतात. दरम्यान, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होत असून जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकृत मृतांची संख्या आणि इतर तपशील लवकरच प्रशासनाकडून जाहीर केला जाणार आहे. उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये 7 जण होते. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5:17 वाजता आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशी हेलिपॅडकडे 7 भाविकांना घेऊन निघाले. वाटेत खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी कठीण लँडिंगला गेले त्यामुळे दुर्घटना झाली आहे.
