बुलढाणा / महान कार्य वृत्तसेवा
पावसाळी अधिवेशन जवळ येऊ लागताच आंदोलनं करुन राज्य शासनापुढे स्वत:चे प्रश्न मांडण्याला वेग आला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. अमरावतीत काही दिवस बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले. सरकारकडून आश्वासन मिळताच बच्चू कडू यांनी आंदोलन थांबवले. यामुळे शांतता निर्माण होत नाही तोच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शेगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शेतकरी शिरला. आमदाराचा बंगला जाळण्याची भाषा करत शेतकरी बंगल्यात दाखल झाला होता.
कुटेंच्या स्वीय सहायकाने शेतकऱ्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुख यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 333, 351 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत. खरीप हंगामासाठी शेत जमीन तयार केली होती. पण जून ऐवजी मे महिन्यात पाऊस पडला. यामुळे काही महत्त्वाची कामं होण्याआधीच पूर्ण जमीन निसरडी झाली आणि शेतीची आधी केलेली कामं वाया गेली. यामुळे झालेल्या हानीची भरपाई मिळावी अशी मागणी करत शेतकरी आमदाराचा बंगला जाळण्यासाठी आला होता.
