Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी करत माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असतानाही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. अशातच आता शेतकरी नेते पाशा पटेल यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठं विधान केलं आहे.

पाशा पटेल काय म्हणाले?

पाशा पटेल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की यातून मार्ग काढतील. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करून कसं चालणार आहे? जे खरोखर शेतकरी आहेत अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे गरजेचे आहे. सरकार कर्जमाफी करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहेत. कर्जमाफी तात्पुरती मलमपट्टी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे.

सरकारच्या शांततेवर आणि निर्णयाला होत असलेल्या विलंबावर बच्चू कडू संतापले आहेत. त्यांनी थेट इशारा दिला आहे की, ”आजवर निर्णय व्हायला हवा होता. सरकार फक्त चर्चा करतंय, कृती नाही. कोणती तारीख आहे? काहीच स्पष्ट नाही. माझ्या कार्यकर्त्यांवर आक्रमण होतंय, शेतकरी हतबल आहे आणि सरकार अजूनही मौन बाळगून आहे. जर 16 तारखेपर्यंत ठोस निर्णय झाला नाही, तर मी जलत्याग करणार आहे.”

आपल्या आंदोलनाची दिशा आणि नैतिकता टिकवण्यासाठी बच्चू कडू यांनी आपल्या समर्थकांना संयम राखण्याची विनंती केली आहे.तसेच रोज मरत बसण्यापेक्षा एकदाच मरण परवडलं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.पण मी त्यांना आवाहन करतो की संयम पाळा.” असंही बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.

कर्जमाफीच्या मागणीवरून आता शेतकरी नेते एकमेकांच्या भूमिकांमध्ये फरक दर्शवत असले तरी, सरकारवर सर्वच बाजूंनी दबाव वाढतो आहे. एकीकडे पाशा पटेल ‘कर्जमाफी ही अंतिम नाही’ असं म्हणत आहेत, तर दुसरीकडे बच्चू कडू यांचा जीव धोक्यात घालणारा संघर्ष सरकारसाठी गंभीर ठरतो आहे.