मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
काँग्रेसचे नेते व आमदार नाना पटोले यांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ”ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा संगणकावरील व्हिडीओ गेम होता”, असे पटोले यांनी म्हटले आहे. ”भारताने हल्ल्याआधीच पाकिस्तानला पूर्वकल्पना दिल्याने पाकिस्तानने आपली माणसे तिथून (जिथे हल्ला केला जाणार होता ती ठिकाणे) हटवली. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारावरून धमकी दिल्यानंतर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर धांबवले”, असेही पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले, ”अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक-दोनदा नव्हे तर डझनभर वेळा सांगितलं आहे की आम्ही दोन्ही देशांना धमकावलं की तुम्ही युद्ध बंद करा अन्यथा आम्ही तुमच्याबरोबरचा व्यापार बंद करू. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले.
काँग्रेस आमदार म्हणाले, ”भारताच्या परराष्ट्रमंर्त्यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात एक वक्तव्य केले आहे. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की भारताने आधी पाकिस्तानला सांगितले होते की आम्ही अमुक ठिकाणे लक्ष्य करणार आहोत. तुम्ही तुमच्या लोकांना तिथून हटवा. याचा अर्थ असा की लहान मुले कॉम्प्युटरवर गेम खेळतात तसा गेम खेळवण्यात आला होता”.
दरम्यान, पटोले यांच्या या वक्तव्यावरून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की ”ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आणि काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ वक्तव्यामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही?”
बावनकुळे पटोलेंना उद्देशून म्हणाले, नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे! देशाच्या जवानांचं शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि भारत मातेच्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधी देखील परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे आणि कोण पाकिस्तानच्या! नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचं मन व मेंदू भष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे”.
