मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
काँग्रेसमधून भाजपात गेलेले आणि भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले मध्य प्रदेशातील माजी आमदार लक्ष्मण सिंह यांची अखेर काँग्रेसने हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर विशेषत: राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका केल्याप्रकरणी त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. यापूर्वी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने लक्ष्मण सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसीला वेळेत उत्तर न दिल्याने पक्षाने बुधवारी (तारीख 12 जून) त्यांचं निलंबन केलं आहे. लक्ष्मण सिंह हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे बंधू आहेत.
”लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सातत्याने लक्ष्य करून लक्ष्मण सिंह यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यांच्या या पक्षविरोधी कृतीमुळे त्यांना काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई तात्काळ प्रभावाने लागू होत आहे,” अशी माहिती काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे सदस्य तारिक अन्वर यांनी बुधवारी दिली.
मध्य प्रदेशातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेले दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंग काँग्रेसमध्ये कधीच रुळू शकले नाहीत. पक्षातील नेत्यांबरोबर मतभेद झाल्यामुळे त्यांनी काही काळ भाजपाचं कमळ हाती घेतले होते. मात्र, तिथेही त्यांची कोंडी होत असल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लक्ष्मण सिंह यांना पुन्हा पक्षात घेऊनही अलीकडील काळात त्यांची टीकात्मक भूमिका काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत होती, असे पक्षातील अंतर्गत सूत्रांनी सांगितले.
