भडाभडा बोलत ड्रायव्हरचा आणखी एक गौप्यस्फोट
इंदूर / महान कार्य वृत्तसेवा
इंदूरच्या राजा रघुवंशीची मेघालयात हत्या होणं, त्याची पत्नी कैक दिवसांसाठी बेपत्ता असणं या सर्व घटनांना आता नव्यानं फाटे फुटत असून, उत्तर प्रदेशातून सोनमला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राजा रघुवंशी हत्याकांडातील हादरवणारी माहिती समोर येत आहे. सोनमनंच राजाची हत्या करण्यासाठीचा कट रचल्याची धक्कादायक बाब तपासातून समोर आली आणि पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.
मेघालय पोलीस गाझीपूरमध्ये आली आणि…
सोनम पोलिसांना शरण आल्यआनंतर लगेचच तिला ताब्यात घेम्यात आलंय ज्यानंतर मेघालय पोलिसांनी गाझीपूर गाठत तिथं सोनमला रिमांडवर घेतलं. त्यादरम्यान या हत्याकांडाचं कानपूर कनेक्शनही खळबळजनकरित्या उघडकीस आलं. मेघालय पोलिसांनी आधी विमानप्रवास करत पटना गाठलं आणि रस्तेमार्गानं ते गाझीपूरला रवाना झाले जिथं त्यांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
गाझीपूरहून जेव्हा सोनमला पटना इथं आणलं जात होतं तेव्हा ती सतत या प्रवासात एकच प्रश्न विचारत होती आणि तो प्रश्न होता, ‘लोकेशन काय आहे?’. गाझीपूर ते पटना प्रवासादरम्यानच्या कार चालकानं दिलेल्या माहितीनुसार फुलवारी शरीफदरम्यान तिनं सतत लोकेशन विचारण्यास सुरुवात केली. आपण कुठे पोहोचलो हेच तिला जाणून घ्यायचं होतं. वाटेत तिला पोलिसांनी खाण्यासाठी विचारलं असता नकार देत आपलं डोकं दुखत असल्याचं सांगितलं होतं.
कारमध्ये कोण-कोण होतं?
सुरुवातीला सोनमची कार उत्तर प्रदेश पोलीस एस्कॉर्ट करत होती. मात्र, बक्सर सीमेत प्रवेश केल्यानंतर बिहार पोलिसांनी या कारवर पाळत ठेवली. सोनमसोबत कारमध्ये मेघालय पोलीस दलातील चारजण होते असंही चालकानं सांगितलं.
राजासोबतचं लग्न सोनमच्या मनाविरुद्ध…?
सूत्रांच्या माहितीनुसार सोनम तिच्याच लग्नानंतर आनंदात नव्हती. राज कुशवाहा नावाच्या एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते आणि याच कारणामुळं तिनं राजाची हत्या करण्याचा कट रचल्याचं म्हटलं गेलं. 2 जून रोजी राजाचा मृतदेह मेघालयातील वेइसाडोंग फॉल्सनजीक सापडला. प्राथमिक माहितीनुसार चाकू आणि स्थानिक हत्यार ‘दाओ’नं अतिशय निर्दयीपणे त्याची हत्या करण्यात आली होती. 20 मे रोजी राजा आणि सोनम शिलाँगला पोहोचले आणि 23 मे रोजी नोंग्रियाट नावाच्या ‘लिविंग रुट बिज’ इथं जाण्याच्या वाटेतूनच हे दोघंही बेपत्ता झाले. 24 मे रोजी त्यांनी प्रवासासाठी वापरलेली स्कूटी एका निर्जन रस्त्यावर आढळली, तर 28 मे रोजी दाटीवाटीच्या जंगलात दोन बॅगा आणि रक्तानं माखलेले कपडे सापडले. ज्यानंतर एका दरीत राजाचा मृतदेह आढळला आणि पाहता पाहता या हत्याकांडाचे अनेक धागेदोरे समोर आले.
