धाराशिव / महान कार्य वृत्तसेवा
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वादाची ठिणगी पडली. भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर समितीच्या कामांवर स्थगिती आणण्यात आली. या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना म्हटले, ”कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील. लक्षात ठेवा, मुख्यमंत्रीपदावर बसलेला नेता भाजपचाच आहे,” असे वक्तव्य केले होते. तर शिवसेनेचे कुडाळचे आमदार आणि नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी त्यांना उद्देशून एक सल्ला देणारी पोस्ट केली होती. नितेश राणे यांनी त्या पोस्टला उत्तरही दिलं. काही वेळाने निलेश राणे यांनी ती पोस्ट हटवली. आता त्यांनी स्वत:च पोस्ट नेमकी का हटवली याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटले होते की, नितेश ने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. निलेश राणे यांनी ही पोस्ट केल्यानंतर नितेश राणे यांनी त्या पोस्टवर मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. निलेशजी तुम्ही ींरद षीशश आहात, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर काही वेळाने निलेश राणे यांच्याकडून पोस्ट डिलिट करण्यात आली. आता यावर निलेश राणे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की, नितेश राणे यांच्याबाबत केलेले ते ट्विट मी अधिकार वाणीने केलेलं होतं. नितेश हा माझा मोठा भाऊ आहे आणि त्याने मला वडिलांप्रमाणे मान दिलेला आहे. त्याला हक्काने बोलणं हा नितेशने मला दिलेला अधिकार आहे आणि त्या सहजतेने मी त्याला बोललो. मी ते ट्विट डिलीट केलं, मला जो त्यातून मेसेज द्यायचा होता तो मी दिला. मी या पूर्वी सुद्धा अनेक ट्विट डिलीट केली आहेत. त्यामुळे हे ट्विट डिलीट केले त्यातून वेगळा अर्थ काढू नका. उभाठाला यातून फायदा घेण्यासारखं काही नाही. एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेला तो सल्ला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
