Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या व तो विकत घेणार्‍या इचलकरंजी, सांगली, सातारा व सोलापूर येथील 8 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने गजाआड केले आहे. या कारवाईत दिपक दत्तात्रय पुजारी (वय 37), विवेक मेघदुत शिंदे (वय 28 दोघे रा. इचलकरंजी),  अंकुश प्रताप शिंदे (वय 30), नंदकिशोर भिकु साठे (वय 30 दोघे रा. बामणी ता. खानापुर जि. सांगली), मनोज मदन गोसावी (वय 29), राजु अमिन शेख (वय 30 दोघे रा. अकलुज, जि. सोलापुर), महेश जम्मु साळुंखे (वय 32 रा. खरसुंडी, ता. आटपाडी), देवदास महादेव तुपे (वय 21, रा. पालवण, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 41 किलो गांजा, 2 चारचाकी, 1 बुलेट, 10 मोबाईल असा 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, अंमली पदार्थांची खरेदी-विक्री व साठा या विरोधात धडक कारवाईचे आदेश पोलिस अधिक्षक योगेश कुमार यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलिस निरिक्षक रविंद्र कळमकर यांनी विविध पथके तयार करुन माहिती घेतली जात असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत हातकणंगले-कुंभोज रस्त्यावर नेज गावचे हद्दीत दोघेजण चारचाकी वाहनातून इचलकरंजीतील काहीजणांना गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दोन पथकांसह सापळा रचून कारवाई केली.

यावेळी इचलकरंजीतील दिपक पुजारी व विवेक शिंदे यांच्यासह गांजी विक्रीसाठी आलेल्या अंकुश शिंदे व नंदकिशोर साठे या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 21 किलो 70 ग्रॅम गांजा, 1 महिंद्रा बोलेरो, 1 बुलेट तसेच 5 मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा 16 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरचा गांजा कोठून आणला या संदर्भात त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत शिंदे व साठे यांनी हा गांजा खरसुंडी (जिल्हा सांगली) येथुन आणल्याची माहिती दिली. त्यानुसार खरसुंडी येथून मनोज गोसावी, राजु शेख, महेश साळुंखे व देवदास तुपे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 20 किलो 125 ग्रॅम गांजा, 1 टाटा झेस्ट गाडी, 5 मोबाईल व रोख रक्कम असा 14 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

गांजाची खरेदी-विक्रीसाठी तस्करी करणार्‍या इचलकरंजी, सांगली, सातारा व  सोलापूर येथील 8 जणांना पकडून तब्बल 41 किलो 195 ग्रॅम गांजा, 2 चारचाकी वाहने, 1 बुलेट, 9 मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 30 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या सर्वांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात एन.डी.पी. एस. कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, प्रदिप पाटील, योगेश गोसावी, संतोष बरगे, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, अशोक पोवार, गजानन गुरव, महादेव कुराडे, राजेश राठोड, हंबीरराव अतिग्रे व राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने केली.