नवी मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका विकृताने झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. भल्या पहाटे बेलापूरच्या शहाबाद गावात ही घटना घडली. आरोपी हत्या करत असताना काही स्थानिकांनी त्याला पाहिलं. त्यांनी आरोपीला बेदम मारहाण करत पोलिसांच्या हवाली केलं आहे. अशाप्रकारे झोपलेल्या व्यक्तीची ठेचून हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकाश लोखंडे असं हत्या झालेल्या 60 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते बेलापूरच्या शहाबाद येथील रहिवासी आहेत. ते नेहमी येथील एका बिजखाली झोपायला जायचे. शनिवारी रात्री देखील ते नेहमीप्रमाणे बिजखाली झोपायला गेले होते. ते गाढ झोपेत असताना अभिषेक नावाच्या एका 28 वर्षीय विकृताने त्यांची दगडाने ठेचून हत्या केली. पहाटेच्या सुमारास बेलापूर शहाबाद गावच्या बिजखाली ही घटना घडली.
हा प्रकार परिसरातील काही स्थानिक लोकांनी पाहिला. त्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली. त्याला जमीनीवर पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एका स्थानिकाने हातात दगड घेत, आरोपीच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र इतरांनी त्याला अडवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आरोपी अभिषेकनं ही हत्या नेमकी कशामुळे केली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र हत्येच्या वेळी अभिषेक दारुच्या नशेत होता. नशेत असतानाच त्याने दगडाने ठेचून प्रकाश यांची हत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जातेय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी अभिषेकलाही ताब्यात घेतलं आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. मात्र तो दारुच्या नशेत असल्याने तो पोलिसांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरं देत नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हत्या कशामुळे केली, याची माहिती अद्याप समोर येत नाहीये. बेलापूर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. अशाप्रकारे बीजखाली झोपलेल्या व्यक्तीची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
