बलात्कार करुन हत्या, सुटकेसमध्ये आढळला मृतदेह
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
मावशीच्या घरी बर्फ आणायला गेलेली चिमुकली रस्त्यातून गायब झाल्यानं मोठी खळबळ उडाली. या चिमुकलीचा मृतदेह कुलूपबंद असलेल्या घरात एका सुटकेसमध्ये आढळून आला. या चिमुकलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याची संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना दिल्लीतील दयालपूर परिसरात घडली असून त्यामुळे मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयाच्या शवागारात सुरक्षित ठेवला आहे. ”या प्रकरणी अज्ञात आरोपीवर बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध सुरू आहे,” अशी माहिती पोलीस पोलीस उपायुक्त आशिष मिश्रा यांनी दिली आहे.
9 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन खून : ”शनिवारी रात्री 8:41 वाजता दयालपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दयालपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कुलूपबंद घरातील सुटकेसमध्ये चिमुकली पडलेली असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ चिमुकलीला रुग्णालयात नेलं. तिथं पोहोचल्यावर डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केलं,” अशी माहिती ईशान्य दिल्लीचे पोलीस उपायुक्त आशिष मिश्रा यांनी दिली.
पोलिसांनी सुरू केला बलात्कार खून प्रकरणाचा तपास : पोलीस उपायुक्त आशिष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”प्राथमिक तपासात डॉक्टरांना पीडितेच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा संशय बळावला आहे. गुन्हे आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची (एफएसएल) पथक घटनास्थळाची पाहणी करत आहेत. नराधमांना लवकर अटक करण्यासाठी अनेक पथकं तपास करत आहेत. घटनास्थळावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज देखील स्कॅन केलं जात आहे.”
बर्फ आणायला चिमुकली गेली होती मावशीच्या घरी : मृत चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलं की, ”चिमुकली शनिवारी संध्याकाळी तिच्या मावशीच्या घरी बर्फ आणण्यासाठी गेली. मात्र बराच वेळ होऊनही ती परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. पोलीस तपासात मात्र चिमुकली मावशीच्या घरी पोहोचली नसल्याचं उघढ झालं. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना विचारल्यानंतर त्यांना ती एका घरात गेल्याचं सांगितलं. तिथं पोहोचल्यावर घराला कुलूप असल्याचं आढळून आलं. मात्र संतप्त नागरिकांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी नागरिकांना मोठा धक्का बसला. घरात एक सुटकेस पडलेली होती, त्यातून रक्त वाहत होतं. ती उघडली असता चिमुकली बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी संतापाची लाट पसरली आहे.”
