Spread the love

15 जणांकडून कोयते, दांडके अन्‌‍ दगडं हातात घेत नागरिकांच्या घरांवर हल्ला

नाशिक / महान कार्य वृत्तसेवा

नाशिक शहरातील पंचवटी परिसरात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. 10 ते 15 जणांच्या एका अज्ञात टोळक्याने नागरिकांच्या घरांवर हल्ला चढवला. या टोळक्याच्या हातात कोयते, लाकडी दांडके आणि दगड होते. त्यांनी रस्त्यावर दहशत माजवत घरांची आणि परिसरातील वस्तूंची तोडफोड केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे.

हल्लेखोर टोळक्यापैकी काही जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज तपासासाठी घेतले असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या म्हसरूळ व पंचवटी परिसरात पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली होती.

टवाळखोरांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न

यानंतर टोळक्याकडून नाशिकच्या पंचवटीत नागरिकांच्या घरावर हल्ला करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दहा ते पंधरा जणांनी हातात कोयता, लाकडी दांडके आणि दगड घेऊन नागरिकांच्या घरांवर हल्ला केला. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईनंतरही अशा प्रकारचा हल्ला झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना तत्काळ अटक करून त्यांच्या कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

नाशिक चोरांचाही धुमाकूळ

दरम्यान, शहरात दिवसाआड सोनसाखळी ओरबाडण्याचे प्रकार सुरु असून अद्यापही चोरटे सापडण्यात पोलिसांना वाव मिळत नसल्याचे चित्र आहे. नुकत्याच दोन घटनांत ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करुन चोरट्यांनी त्यांचे दागिने पळविले असून, तिसऱ्या घटनेत सातपूर भागात एका व्यक्तीची जबरी लूट करण्यात आली आहे. याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. प्रमिला सुरेश पवार (17, रा. बेंडकुळेनगर, गंगापूररोड) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. 06) सकाळी पावणे आठच्या सुमारास  त्या गंगापूररोडने मॉर्निंग वॉक करीत होत्या. रियॉल्टो बिल्डिंगसमोर त्या असताना, पिवळ्या रंगाच्या टी-शर्ट घातलेला संशयित त्यावेळी मोहनलाल थाळीशेजारील वॉईन शॉपसमोर उभा होता. प्रमिला पवार या पायी चालत असताना संशयित पाठीमागून चालत आला आणि त्याने त्यांच्या गळ्यातील 60 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून पळ काढला.

तर सुमन रामदास निकम (69, रा. पीयूष सुयश अपार्टमेंट) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. 6) दुपारी एकच्या सुमारास त्या अपार्टमेंटमध्ये एकट्या असताना संशयित भाग्यश्री व तिचा पती रवी खैरनार हे दोघे त्यांच्या घरात लबाडीच्या इराद्याने शिरले. त्यावेळी संशयितांनी त्यांच्या गळ्यातील 1 लाख, 20 हजारांची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेली.

तसेच र्त्यंबकरोडवरील ज्योती विद्यालयासमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कारचालकाला लुटल्याचा प्रकार घडला. सॅम्युअल स्टिफन फर्नाडिस (37, रा. जाधव संकुल, अशोकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.05) दुपारी तीनच्या सुमारास ते त्यांच्या वॅनआर कारने जात असताना सीटबेल्ट लावण्यासाठी ज्योती विद्यालयासमोरील मोकळ्या जागेत थांबले. त्यावेळी दोन दुचाकीवरुन संशयित आले. यातील एकाने सॅम्युल यांच्या शर्टच्या खिशातील पैसे बळजबरीने हिसकावून घेत पळ काढला.