येण्या-जाण्याचा त्रास नको; ठाकरेंचे खासदार ओमराजेंचा पलटवार
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सध्या वादाची ठिणगी उडाली आहे. भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर समितीच्या कामांवर स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील भाजपच्या मेळाव्यात बोलताना म्हटले की, ”कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले, तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा, सगळ्यांचा बाप म्हणून मुख्यमंत्रीपदावर भाजपचाच नेता बसलेला आहे,” असे वक्तव्य केले. आता नितेश राणे यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे, जनता ही मस्ती उतरवण्याचं काम करेल. भाजपला आता राष्ट्र प्रथम या विचाराचा विसर पडला आहे. आमच्या सोबत आले तरच निधी हा लोकशाहीचा खून असून अशा वृत्तीला ठेचायला हवं, असा हल्लाबोल त्यांनी नितेश राणे यांच्यावर केला आहे.
नितेश राणेंना धाराशिवमध्ये घर बांधून द्या
जनता ही सगळ्यांचा बाप असते त्याचा विसर पडू नये, जनता तुम्हाला धडा शिकवीन. नितेश राणेंना धाराशिवमध्ये घर बांधून द्या. त्यांना जाण्या-येण्याचा त्रास नको, जनतेचे प्रश्न त्यांना किरकिर वाटत असेल तर ते आम्ही करणारच आहोत, अशी टीका देखील ओमराजे निंबाळकर यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे. आता ओमराजे निंबाळकर यांच्या टीकेला नितेश राणे काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निलेश राणेंच्या नितेश राणेंच्या वक्तव्यावर नाराजी
दरम्यान, नितेश राणे यांच्या वक्तव्यावर त्यांचे बंधू निलेश राणे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत निलेश राणे यांनी म्हटले आहे की, ”नितेशने बोलताना जपून बोलायला हवे. मी त्याला भेटल्यावर याबद्दल नक्कीच बोलेन. मात्र सार्वजनिकरित्या बोलताना प्रत्येक गोष्टीचं भान ठेवायला हवं. सभेत बोलणं सोपं असतं, पण आपल्या बोलण्यामुळे नेमका कोणाचा फायदा होतोय, हे समजून घेणं आवश्यक आहे. आपण महायुतीचा भाग आहोत, हे विसरून चालणार नाही. ”
