वॉशिंग्टन / महान कार्य वृत्तसेवा
ज्यांना देशहितासाठी काम करणं हे पक्षविरोधी कृत्य असल्याचं वाटतं, त्यांनी स्वत:लाच प्रश्न विचारण्याची गरज आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करताना काँग्रेसच्या काही नेत्यांनी टीका केली होता. त्यावर शशी थरुर म्हणाले, ” जेव्हा कोणी देशाची सेवा करत असतो, तेव्हा त्यानं अशा गोष्टींबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही, असे वाटते.”
भारतात परतल्यानंतर पक्षाच्या नेत्यांना काय संदेश द्याल असे विचारले असता थरुर म्हणाले, ”मला प्रामाणिकपणे वाटते, सध्या आपण येथे एका मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं आहे. विविध व्यक्तींकडून काय बोललं जात नाही, याची काळजी करण्यात आपल्याला जास्त वेळ घालवण्याची गरज नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण त्याचा) सामना करू.
संपूर्ण भारताचे प्रतिनिधी म्हणून आलो- शशी थरूर काँग्रेस सोडून भाजपामध्ये सामील होतील, अशी सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. त्याबाबत विचारले असता खासदार थरुर म्हणाले, ”मी संसदेत निवडून आलेला खासदार आहे. माझ्या कार्यकाळाची चार वर्षे शिल्लक आहेत. तसा प्रश्न का विचारण्यात येत आहे, याबाबत मला माहित नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शरणागती पत्करल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. त्याबाबत थरुर म्हणाले, ”लोकशाहीमध्ये ही सामान्य गोष्ट आहे. राजकीय पक्ष टीका करतात. निवडणूक लढवितात आणि मागण्याही करतात. आम्ही येथे पक्षाच्या राजकीय मोहिमेवर आलेलो नाही. आम्ही येथे संपूर्ण भारताचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. सर्वपक्षीय शिष्टमंडळात तीन धर्म आणि सात राज्य, पाच राजकीय पक्षांचे सदस्य आहेत, याकडं त्यांनी लक्ष वेधले.
एकात्मतेचा संदेश देण्यावर लक्ष- थरूर यांच्याव्यतिरिक्त, शिष्टमंडळात खासदार सरफराज अहमद, गंटी हरीश मधुर बालयोगी, शशांक मणी त्रिपाठी, भुवनेश्वर कलिता, मिलिंद देवरा, तेजस्वी सूर्या आणि अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरनजीत संधू यांचा समावेश होता. हे शिष्टमंडळ 24 मे रोजी न्यू यॉर्कमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात वॉशिंग्टनला पोहोचण्यापूर्वी शिष्टमंडळानं गयाना, पनामा, कोलंबिया आणि बाझीलचा प्रवास केला. त्याबाबत थरुर म्हणाले, ”या शिष्टमंडळात विविधतेत एकता आहे. आपण एकात्मतेचा संदेश देण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जेव्हा देशहिताचा, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा मला प्रामाणिकपणे वाटते की आपण राष्ट्र म्हणून एक आहोत.”
अमेरिकेनं मध्यस्थी केली का?भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात ट्रम्प यांच्याकडून मध्यस्थी करण्यात आल्याचा वारंवार दावा करण्यात आला होता. त्याबाबत थरुर म्हणाले, ”त्याबाबत मला लक्ष देण्याची गरज नाही. अमेरिकेशी असलेल्या भारताच्या संबंधात कोणत्याही प्रकारची गुंतागुंत निर्माण करण्यासाठी येथे आलो नाही. आम्हाला अमेरिकेच्या अध्यक्ष पदाबद्दल आणि अमेरिकन अध्यक्षांबद्दल प्रचंड आदर आहे. जर पाकिस्ताननं प्रत्युत्तर दिलं तर आम्ही त्यांना आणखी जोरदार प्रहार करू, असं आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं आहे. जर ते थांबले तर आम्ही थांबू, असे सांगितलं होतं. आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला थांबण्यास सांगण्याची गरज नव्हती. कारण पाकिस्ताननं बोलताच आम्ही थांबणार होतो.” कशामुळे राजकीय शिष्टमंडळ गेले अमेरिकेत?- 22 एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील अत्यंत तणावाची स्थिती निर्माण झाली. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर भारतानं 7 मे रोजी पहाटे भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सामंजस्य करार करण्यात आला. मात्र, पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादाला खतपाणी दिले जात असताना भारतानं सर्वपक्षीय असलेल्या खासदारांचे शिष्टमडंळ अमेरिकेसह जगभरात पाठविली आहेत.
