Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मकता दर्शवली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्षाचे नेते परदेशी दौऱ्यावर गेले आणि या युतीच्या चर्चा थंडावल्या होत्या. मात्र, आता मनसेने पर्यावरण दिनानिमित्त दादर-माहिम विधानसभा मतदार संघात खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवलं आहे. या अभियानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना अमित ठाकरेंनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीवरही भाष्य केलं आहे. ”दोन भावांनी बोललं पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अमित ठाकरे?

मनसे शिवसेना युतीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले, ”माझी भूमिका एवढीच आहे की, दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याची (राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे) यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा. पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठरवावं, आम्ही बोलून काही उपयोग नाही, असंही पुढे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 पुढे अमित ठाकरे म्हणाले, या घडामोडीकडे मी लक्ष देत नाही. पण, राज ठाकरे आणि उद्धवजी बोलले तर होईल. आम्ही खालची लोक बोलून अर्थ नाही, आम्ही याआधी संवाद साधला आहे, आता दोघांकडे एकमेकांचा फोन नंबर आहे त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही 2014-17 मध्ये प्रस्ताव दिला होता, तेव्हा काय झाले शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो. आता त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर पुढे यायला हवं. आम्हाला एकत्र येण्यावर काहीही इशू नाही, असंही पुढे अमित ठाकरे म्हणालेत.

”झाडं लावली पाहिजेत”

”आपण झाडांमुळे जिवंत आहोत. एका माणसासाठी आपल्याला 4 झाडं पाहिजेत असा निसर्गाचा नियम आहे. पण इकडे एका झाडामागे 5 माणसं श्वास घेत आहेत. लोकांना याचं महत्व कळत नाही. आपण जेव्हा खिळा मारतो, तेव्हा झाडांनाही त्रास होतो. झाडं लावली पाहिजेत, ती वाचवली पाहिजेत, जगवली पाहिजेत” असं देखील अमित ठाकरे यांनी पर्यावरण दिनानिमित्त म्हटलं आहे.