Spread the love

1238 ग्रॅम चांदी, 66 किलोच्या तांबे-पितळाच्या मूर्ती जप्त

नाशिक / महान कार्य वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मंदिरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवली होती. या प्रकरणातील मोठा तपास उलगडत नाशिक ग्रामीण पोलिसांनी एक उच्चशिक्षित अभियंता आणि त्याच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष बाब म्हणजे ही टोळी सोशल मीडियाचा वापर करत पुरातन मंदिरांची माहिती गोळा करत होती आणि नंतर याच मंदिरांमध्ये चोरी करत होती.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रमुख आरोपींपैकी एक सुयोग दवंगे (रा. हिवरगाव, ता. संगमनेर) हा मॅकेनिकल अभियंता असून, तो एक सराईत गुन्हेगार आहे. तो आणि त्याच्या साथीदारांनी गूगल आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरून राज्यातील विविध पुरातन मंदिरांची माहिती शोधली. यानंतर रात्रीच्या वेळेस हायड्रॉलिक कटरसारख्या यंत्रसामुग्रीचा वापर करत कुलूप तोडून चोरी केली जात होती. या टोळीने सिन्नर, लासलगाव, निफाड आणि वाडीवऱ्हे परिसरातील एकूण 7 मंदिरांमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी टोळीकडून तब्बल 66 किलो वजनाच्या तांब्या-पितळाच्या मूर्ती, घंटा व इतर धार्मिक वस्तू, तसेच 1238 ग्रॅम चांदी हस्तगत केली आहे.

तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मोठी कारवाई

घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक वेिषण आणि खबऱ्यांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार संशयितांचा शोध घेण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकण एमआयडीसी येथून सुयोग दवंगे याला अटक केली. त्याच्या चौकशीतून संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे (रा. टिटवळा, कल्याण) आणि अनिकेत अनिल कदम (रा. आरके नगर, कल्याण) ही नावे पुढे आली. यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, पुढील चौकशीत संदीप किसन साबळे (रा. अकोले) आणि दिपक विलास पाटेकर (रा. कल्याण) यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सध्या हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

ठार मारण्याचा प्रयत्न करणारा गुन्हेगार जेरबंद

दरम्यान, नांदूर नाका येथील महापालिकेच्या गार्डनमध्ये पावभाजी खात असताना फिर्यादीस प्रकाश विसपुते ऊर्फ पक्या खटकी याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीमुळे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने पथक तयार करून संशयिताच्या शोधादरम्यान तो बटुक हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापडला. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने स्वत:चे नाव प्रकाश राजेंद्र विसपुते ऊर्फ पक्या खटकी (वय 40, रा. आमपाली झोपडपट्टी, म्हसोबा मंदिराजवळ, उपनगर, नाशिक) असे सांगितले. दरम्यान, संशयित प्रकाश विसपुते याच्याविरोधात पुढील कारवाईसाठी त्याला आडगाव पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीवर यापूर्वीही भद्रकाली पोलिस ठाण्यात तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच पंचवटी आणि आडगाव पोलिस ठाणे, तसेच विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.