Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्याबाबत अनेक खळबळजनक आरोप समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अमरावती कारागृत बंदिस्त कारागृहात असणाऱ्या एका कैद्याकडून 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कैद्याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयात तशी तक्रार केली आहे. या प्रकरणामध्ये पुण्यातील सावकार नानासाहेब आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांचं नाव समोर आलं असून ते सूनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन गेली काही वर्षे तुरुंगात आहेत. या बाप-लेकांनी त्यांच्या वकिलांमार्फत जालिदर सुपेकर यांनी त्यांना 550 कोटी रुपये मागितल्याची तक्रार न्यायालयात केली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

गणेश गायकवाडचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेत गेलेल्या दिपक साळुंखे यांच्या मुलीसोबत 2017 मध्ये लग्न झालं होतं. मात्र, हुंड्यासाठी तीचा छळ होत होता. पेटवलेल्या सिगारेटचे चटके देऊन तीला मारहाण केली जात होती, अशी तक्रार 2021 मध्ये पोलीसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर गायकवाड बाप लेकांना अटक झाली होती. नाना गायकवाडच्या सावकारी विरुध्द अनेक जणांनी तक्रारी केल्याने त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, येरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्याच्यावर इतर कैद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्यांना आणि गणेशला अमरावती कारागृहात हलवण्यात आले होते. गायकवाडच्या वकीलाने केलेल्या दाव्यानुसार जालिंदर सुपेकर तुरुंग उपमहानिरिक्षक असताना 19 ऑगस्ट 2023 ला अमरावती कारागृहात आले होते आणि तिथे त्यांनी गायकवाडला 500 कोटी रुपये जामिनासाठी मागितल्याचा आरोप गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात दाखल याचिकेत केला आहे. तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढतो, असे सुपेकर यांनी सावकार यांनी म्हटल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. त्यामुळे आता जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

गणेश आणि नानासाहेब गायकवाड कोण आहेत?

पुण्याच्या औंध परिसरात राहणारे नानासाहेब गायकवाड हे चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. तर गणेश गायकवाड हा मोठा उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहे. औंध आणि बाणेर परिसरात त्यांनी अनेक मॉल, आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने, कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत. यातून गणेश गायकवाड याला दरमहा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. त्याने त्यावेळी भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, या कृत्यांमुळे त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार असताना दिपक साळुंखे यांची मुलगी मुक्ता हीचा विवाह गणेश गायकवाड याच्यासोबत झाला. दिपक साळुंखे हे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकदा राष्ट्रवादी तर एकदा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. गायकवाडांना पाचशे कोटी साळुंखे यांच्यासाठी मागण्यात आलाचा आरोप आहे. यामध्ये दिपक साळुंखे, मुक्ता साळुंखे, जालिंदर सुपेकर, अमरावती कारागृह प्रशासन आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. गणेश गायकवाडचे वडील नाना गायकवाड पुण्यात सावकारकीसाठी ओळखले जायचे. 2017 मध्ये लग्न झाल्यानंतर हुंड्यासाठी मुक्ताला मारहाण करण्यात येत असल्याची तक्रार तिने केली. 2018 ला तीने पहिली तक्रार दाखल केली. त्यानंतर देखील छळ चालूच राहिल्याने 2021 मध्ये तीने पुन्हा तक्रार दिली. या तक्रारीनंतर गायकवाड बाप लेकांना अटक झाली आणि पुढे मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.