जालन्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
जालना / महान कार्य वृत्तसेवा
जालना जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. चक्क फरशीवर गादी टाकून रुग्णांवर सलाईनद्वारे उपचार सुरु असल्याचं दृश्य समोर आलं आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे.
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एका अपघातग्रस्त रुग्णावर चक्क जमिनीवर सलाईन लाऊन उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. काल रात्री एका अपघातग्रस्त रुग्णाला उपचारासाठी जनरल वार्डामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, इतरत्र बेड उपलब्ध असताना त्याच वार्डात त्याच्यावर जमिनीवर गादी टाकून सलाईन लावण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास 200 बीडची सोय आहे. तरी देखील सामान्य रुग्णालयात अशा प्रकारे रुग्णाच्या जीवाशी का खेळ केला जातोय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सखोल चौकशी करुन दोषींवर करावाई केली जाणार दरम्यान झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून ज्यांनी जाणीवपूर्वक रुग्णाला फरशीवर उपचार दिले त्याच्यावर कारवाई करण्यात येणारा असल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा शल्यशिक्षकांनी दिली आहे.
