मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मी हार मानणारा माणूस नाही. मी आता तालुक्यात फिरुन जनतेशी संवाद साधणार आहे. आमचं काय चुकलं आहे, हे जनतेला विचारणार आहे. आमच्या ढीग चुका झाल्या असतील पण नवे नेतृत्व तालुक्यासाठी लाभकारक नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. ते फलटण तालुक्यातील कुरवली येथे बानगंगा धरण पाणी पूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक शैलीत विरोधकांना इशारा दिला.
आम्ही शुन्यातून राजकारण निर्माण केलं आहे. कोण होतं आपल्याकडे, एक माणूस नव्हता. इथल्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी आम्हाला उचलून धरलं आहे. माझ्या वयाचे कार्यकर्ते आता थकले आहेत. त्यामुळे आता काही ना काही कारणाने मी बाहेर पडणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अडचणी तयार झाल्या, त्यामुळे मी अडकून बसलो. मी फलटण तालुक्यात कुठलंही राजकारण न करता लोकांना भेटून जाणून घेईन, आमचं काय चुकलंय आणि त्या चुका दुरुस्त करतो. आमचं ढीग चुकलं असेल, पण तुमच्यापुढे आज जे नेतृत्व तयार होतंय, ते नेतृत्व तुम्हाला आणि तुमच्य पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही. तुम्हाला याचा अनुभव येत असेल. त्यामुळे तालुक्याची बसवलेली घडी कोणाला विस्कटू देणार नाही, असा देखील इशारा रामराजे यांनी आपल्या भाषणामध्ये दिला आहे.
आमच्यातील काही लोक सोडून गेले. सगळं सोप्या पद्धतीने होत गेलं की, त्याची किंमत राहत नाही, हे कळायला उशीर झाला. मी राजकीय किंमत मागण्यासाठी काम केलं नाही. माझ्यावर पिढ्यानुपिढ्या हे संस्कार झाले आहेत की, संधी मिळाली की जनतेसाठी काम करायचे. माझ्या तोंडात ‘मसाकार’ हा शब्द कमी असतो. माझ्या आजोबांनी तुमच्याकडे जनता म्हणून पाहिलं. तुम्हाला मतांचा हक्क मिळाला असेल. मी राजा आहे की नाही, हा वादाचा मुद्दा आहे, ते मला माहिती नाही. मी मीडियात जास्त दिसत नाही. पण मी सगळं बघत असतो. आम्हाला उत्तर देणारे बोलतात की, आम्ही हे केलं नाही, ते केलं नाही. पण तुम्ही जे केलंय त्याचा 90 टक्के पाया आम्ही घातलाय, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना सुनावले.
