पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुण्यात सिगारेट मागण्यावरून झालेल्या वादातून एका 26 वर्षीय तरुणाची डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील विठ्ठलनगर येथील साई कृपा हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये उघडकीस आली आहे. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. सोमवारी सकाळी ही घटना घडल्याने पुण्यात सध्या खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
आरोपीवर गुन्हा दाखल
अक्षय संजय ठोके (वय 26, रा. विठ्ठलनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी आरोपी विश्वास भीमा शिंदे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अक्षय हा रविवारी सकाळी सोसायटीच्या पार्किंगमधील मोकळ्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी विश्वास शिंदे आणि मयत अक्षय ठोके यांच्यात सिगारेट मागण्यावरून वाद सुरू झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात मयत अक्षयने आरोपी विश्वास याच्या दिशेने सिमेंट ब्लॉक फेकून मारला. विश्वासने तो वार चुकवला. मात्र, या घटनेमुळे विश्वासचा राग अनावर झाला. त्याने तातडीने तोच सिमेंट ब्लॉक उचलून अक्षयच्या डोक्यात चार ते पाच वेळा घातला.
या गंभीर मारहाणीमुळे अक्षय संजय ठोके याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संत तुकाराम नगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी विश्वास शिंदे याला अटक करण्यात आली आहे. सिगारेटसारख्या क्षुल्लक कारणावरून तरुणाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
