Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (जऊख) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पंजाब किंग्ज फायनलमध्ये गेल्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला असून, आता तो ऑस्ट्रेलियासाठी केवळ टी-20 क्रिकेटमध्ये उपलब्ध असेल. शारीरिक अडचणी आणि 2027 च्या विश्वचषकापर्यंत खेळू शकणार नाही, या विचारातून मॅक्सवेलने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

36 वर्षीय मॅक्सवेलने आपल्या 13 वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. ऑगस्ट 2012 मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3990 धावा केल्या असून, 77 बळीही घेतले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार शतके आहेत, ज्यात 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध पुण्यात केलेल्या नाबाद 201 धावांच्या ऐतिहासिक द्विशतकाचा समावेश आहे, जी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक मानली जाते.

मॅक्सवेल हा 2015 आणि 2023 च्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा अविभाज्य भाग होता. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस स्टॉइनिस यांच्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणारा मॅक्सवेल हा 2023 च्या विश्वचषक विजेत्या संघातील चौथा खेळाडू आहे. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे रोहित शर्माचं स्वप्नभंग झालं होतं. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी मॅक्सवेलच्या कारकिर्दीचे कौतुक केले. ”ग्लेन हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात डायनॅमिक खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जाईल, ज्याने दोन विश्वचषक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली,” असे बेली म्हणाले.