माहेरच्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; हत्येचे खरं गूढ उकललं!
नागपूर / महान कार्य वृत्तसेवा
नागपूर शहराच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या परिसरातील भीमनगर येथे राहणाऱ्या दाम्पत्यातील घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. या दु:खद घटनेत सुरुवातीला हा खून नसून हृदयविकाराचा धक्का असल्याचे पतीने भासवलं. मात्र महिलेच्या कुटुंबीयांना तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसल्या. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले असता तिथे पोस्टमॉर्टममध्ये या हत्येची सत्यता समोर आली आहे. या घटनेतील आरोपी पती हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शीतल जॉन्सन मंडपे (वय 39 वर्ष) असे मृत पत्नीचे तर जॉन्सन मंडपे (41) असे आरोपी पतीचे नाव आहे.
कौटुंबिक वाद विकोपाला; घरात कुणी नसतांना पत्नीला संपवलं
पुढे आलेल्या माहितीनुसार, मंडपे दाम्पत्यात गेल्या सात वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे ते दोघे एकमेकांपासून वेगवेगळे राहत होते. शिवाय शीतल आणि जॉन्सनला दोन लहान मुले देखील आहेत. दरम्यान शीतल आणि जॉन्सन मध्ये काही कारणावरून वाद झाला आणि कालांतराने तो उफाळून आला. त्यातच 22 मेच्या रात्री शीतल घरी एकटीच असताना सकाळच्या सुमारास जॉन्सनने शेजाऱ्यांना सांगितले की, तिचा रात्रीच्या सुमारास अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मात्र वादाची पार्श्वभूमी लक्ष्यात घेता शीतलच्या नातेवाईकांनी या मृत्यूवर संशय आला. त्यांनी घटनास्थळी पोहोचल्यावर पाहणी केली असता शितलच्या शरीरावर ओरखडे, जखमा आणि गळा दाबल्याचे वण स्पष्टपणे दिसलेच, शिवाय चादरीवर रक्ताचे डागही आढळून आले. यावरुन या खुनाची सत्यता समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबी तालुक्यात माहेरून पैसे घेऊन ये, असं म्हणत 30 वर्षीय विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर दोरीने बांधून चटके ही दिले. सासरच्या लोकांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. ही घटना फुलंबी तालुक्यातील चौकावाडी येथे घडली. याप्रकरणी फुलंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीम अब्दुल शेख राहणार चौका वाडी आणि नणंद शबाना निसार शेख आणि रिजवाना इमान शेख असे आरोपीचे नाव असून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
