Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

शिवीगाळ केल्याचे सांगितल्याच्या कारणावरुन जमाव जमवून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून लोखंडी हत्यार दाखवत धमकावत रिक्षाची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी वैशाली सुनिल जाधव (वय ५५, रा.जवाहरनगर) यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

येथील जवाहनगरमधील वैशाली जाधव यांच्या घरासमोर सोमवारी रात्री अविनाश बाळासो कोरवी, सुरज मारुती माने, अजय कोरवी (सर्व रा.जवाहरनगर), गणेश आडेकर (रा.गणेशनगर) यांच्यासह अनोळखी २० जणांचा जमाव आला. या जमावाने वैशाली यांचा पुतण्या सुमित जाधव याचे नाव घेऊन शिवीगाळ केली. तसेच कोरवी गल्लीत राहणार्‍या वैशाली यांच्या जाऊ रंजना संजय जाधव यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारुन मुलगा प्रमोद याचे नाव घेत शिवीगाळ करत घरात घुसले. प्रमोद कुठे आहे अशी विचारणा करत त्यांनी यंत्रमागाचा मार्‍या आणि लोखंडी हत्यारदाखवत तुझ्या मुलाला आम्ही काय आहे. ते दाखवतो अशी धमकी देऊन गेले. जाताना त्यांनी यंत्रमागाच्या मार्‍याने मुजावर यांच्या रिक्षाची काच फोडुन नासधुसही केली. याप्रकरणी वैशाली जाधव यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.