Spread the love

छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा

शहरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकणाऱ्या एकाचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री साजापूर शिवारात घडली. मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकर एका हॉटेलमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. मात्र आरोपीला पोलीस दिसताच त्यानं पोलिसांच्या अंगावर गाडी घालत गोळी चालवली. यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर, एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून बंदूक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर, मुख्य आरोपी अमोल खोतकर रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.

…अशी घडली घटना : बजाजनगर येथील रहिवासी उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी जबरी दरोडा टाकण्यात आला होता. याबाबत शहर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. त्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर असल्याची माहिती मिळाल्यानं त्याचा माग पोलिसांनी काढायला सुरुवात केली. गेल्या तीन दिवसांपासून त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना सोमवारी रात्री अकरा वाजता अमोल एका हॉटेल वर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला, आरोपी तिथं आला. पण पोलीस तिथं असल्याची कुणकुण लागताच त्यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडील असलेली गाडी त्यानं पोलिसांच्या अंगावर घातली. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून ती गेली, त्यात आरोपीनं गोळी देखील चालवली. प्रतिउत्तर देताना एपीआय रविकिरण गच्चे यांनी देखील गोळी चालवली. त्यात अमोल खोतकर गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तर त्याच्या सोबत असलेल्या एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

15 मे रोजी टाकला होता दरोडा : बजाजनगर येथील आरएल सेक्टरमधील प्लॉट नंबर 93 मध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात 15 मे रोजी सकाळी 4 वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी तब्बल 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी व रोख रक्कम लंपास केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष लड्डा यांची वाळूज एमआयडीसीमध्ये दिशा ऑटो कॉम्प्स नावानं के 237 भागात कंपनी आहे. ते कुटुंबीयांसह 8 मे रोजी विदेशात गेले आहेत. दरम्यान, संतोष लड्डा यांचा चालक संजय झळके हे घराची देखभाल करत होते. ते रात्री घरात एकटेच झोपलेले असताना दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. या दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी अमोल खोतकर होता, त्याच्याकडेच लुटलेला मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खोतकर यानं लुटलेले सोनं, चांदी शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.