Spread the love

वडोदरा / महान कार्य वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज येथील गांधीनगरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले होते. या रोड शो नंतर नरेंद्र मोदींनी एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ”1947 मध्ये भारतमातेची फाळणी झाली. साखळ्या तोडायला हव्या होत्या, पण हात कापले गेले. देशाचे तीन भाग झाले. त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला. मुजाहिद्दीनच्या नावाखाली दहशतवाद्यांचा वापर करून पाकिस्तानी लोकांनी भारतमातेचा एक भाग ताब्यात घेतला.”

याचबरोबर, ”जर त्या दिवशी त्या मुजाहिद्दीनला मारलं गेलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती. सरदार पटेल यांची इच्छा होती की, आपलं सैन्य पीओके मिळवेपर्यंत थांबू नये. पण कोणीही त्यांचं ऐकलं नाही आणि आता आपण गेल्या 75 वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहोत. पण, आता दहशतवाद संपवण्याचा निर्धार केला आहे. पहलगाम हे देखील याचं उदाहरण होतं. तसंच जेव्हा आपलं पाकिस्तानशी युद्ध झालं, तेव्हा आम्ही पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केलं,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढं नरेंद्र मोदी म्हणाले की, ”शरीर कितीही निरोगी असलं तरी, जर काटा टोचला तर संपूर्ण शरीर त्रासलेलं राहतं. आता आपण तो काटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, गेल्या दोन दिवसांपासून गुजरातमध्ये आहे. सोमवारी आणि आज वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबादला भेट दिली. जिथं गेलो तिथं लोकांमध्ये देशभक्तीची भावना दिसून आली.”

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जमले होते. दरम्यान, नरेंद्र मोदींनी जनतेचं स्वागत केलं. याचबरोबर, नरेंद्र मोदी लवकरच गांधीनगरमध्ये शहरी विकास वर्ष 2025 चा शुभारंभ करतील. हे राज्यातील पद्धतशीर आणि शाश्वत शहरी परिवर्तनाला 20 वर्षे पूर्ण झाल्याचं प्रतीक आहे. यामध्ये गुजरातच्या शहरी धोरणाच्या पुढील टप्प्याची रूपरेषा दाखवली जाईल.

यात राज्याचे उच्च अधिकारी, शहरी नियोजनकार आणि सर्व क्षेत्रातील भागधारकांचा समावेश असणार आहे. याशिवाय, पंतप्रधान शहरी विकास, आरोग्य सेवा आणि पाणीपुरवठा याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्धाटन आणि पायाभरणी करतील. या कार्यक्रमादरम्यान बहु-क्षेत्रीय दृष्टिकोनातून वायू प्रदूषणाचा सामना करण्याचं उद्दिष्ट असलेला राज्य स्वच्छ हवा कार्यक्रम देखील सुरू केला जाईल.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाहोद जिल्ह्यात लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचं उद्धाटन केलं. हा प्लांट देशांतर्गत ऑपरेशन्स आणि निर्यातीसाठी शक्तिशाली 9000 एचपी इलेक्ट्रिक इंजिन्सची निर्मिती केली जाईल. या प्लांटमध्ये उत्पादित केलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनला नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. या उच्च शक्तीच्या इंजिनमुळे भारतीय रेल्वेची मालवाहतूक क्षमता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल अशी अपेक्षा आहे.