Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
येथील उपनगरातील महिला बचत गटात किरकोळ वादावादी झाली होती. हे प्रकरण त्या एका औद्योगिक वसाहतीत असलेल्या पोलीस ठाण्यात पोहचले. येथेही किरकोळ वाद झाला. या वादाने त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चांगलीच सटकली आणि त्याने चक्क बचत गटातील महिलांच्या कानाखाली लगावली. अचानक घडलेल्या या प्रकाराने महिलांची एकच तारांबळ उडाली. चुक लक्षात आल्यानंतर त्या अधिकाऱ्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. काही माजी लोकप्रतिनिधींनी महिलांची समजूत काढून विषयावर पडदा टाकला. सध्या या प्रकरणावर पडदा पडला असला तरी चक्क महिलांवर हात उचलण्याचं धाडस ‌‘त्या’ अधिकाऱ्याकडे आलेच कुठून, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. प्रजासत्ताक दिनी हा प्रकार घडला असून वरिष्ठ पोलीस अधिकारीही याबाबत अनभिज्ञ आहेत की जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात, असेही लोक बोलत आहेत.

हातकणंगले पोलिसांनी लाडक्या बहिणीला मंगळसुत्र विकायला भाग पाडले. याच्याही पुढे जात इचलकरंजीतील एका पोलीस अधिकाऱ्याची सटकली, अन्‌‍ चक्क त्याने एका लाडक्या बहिणीच्या कानाखालीच आवाज काढला. त्यामुळे या दोन्ही प्रकरणामुळे कोल्हापूर पोलीस दलाची चांगलीच नाचक्की झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. दरम्यान, राज्याची सुत्रं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना बहिणीच्या अंगाला हात लावण्याचं कुणाचं धाडस होत नव्हतं. त्यांच्याकडून सुत्रे जाताच राज्यातील बहिणी अशा प्रवृत्तीमुळे पुन्हा असुरक्षित होऊ लागल्याचे या निमित्ताने बोलले जात आहे. तर अशा पातळी सोडलेल्या निर्लज्ज अधिकाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी महिला वर्गातून पुढे आली आहे.


दरम्यान, आठ दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन युवतीने शेजारील गावातील एका युवकालाच पळवून नेल्याचे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं होतं. या प्रकरणात गावातील जुन्या-जाणत्यांनी गावातच तडजोडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. प्रकरण हातातून निसटणार याची कुणकूण ‌‘त्या’ अधिकाऱ्याला लागली आणि त्याने तपासी अंमलदाराला ‌‘त्या’ गावात गाडी फिरवून येण्यास सांगितले. त्यानंतर त्या दोघांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं आणि जाब जबाब झाले. रात्री 11 पर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले. अंधाऱ्या रात्रीत ‌‘तडजोड’ झाली आणि घटनेने व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. संविधानाला अभिप्रेस आहे, असेच काम आम्हाला केलं पाहिजे, असे लेक्चर देत त्या दोघांची अंधाऱ्या रात्रीतून मुक्तता करण्यात आली.

दोन महिन्यापूर्वी हातकणंगले येथील लॉजवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. ही मुलगी सांगली रोडवरील एका कॉलेजमधून बाहेर पडल्यामुळे या घटनेची नोंद ‘त्या’ अधिकाऱ्याच्या पोलीस स्टेशनला नोंद झाली आणि तपासाची सूत्रं हालली. संबंधित बलात्काऱ्याला ताब्यात घेतलं मात्र लॉजवर अल्पवयीन मुलीला प्रवेश कसा दिला गेला? याची साधी चौकशी सुध्दा झाली नाही. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संबंधित हा लॉज असल्यामुळे लॉज चालकावर कारवाई झाली नसावी, अशी त्यावेळी चर्चा होती. बिचाऱ्या मुलीचे गरीब आईबापाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नाही, अशा तिखट प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या.

महिला आयोगाने लक्ष द्यावे
पोलीस अधिकाऱ्यांकडून महिलांचा अनादर होत असून मंगळसुत्र विकायला लावण्यासह कानाखाली मारण्यापर्यंत मजल गेलेल्या अधिकाऱ्यांवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गातून पुढे येऊ लागली आहे.