Spread the love

शार्प शुटर्स 26 डिसेंबरला लातूरमध्ये हल्ल्याच्या तयारीत होते, पण….


ठाणे/महान कार्य वृत्तसेवा
शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून शहरातील शिवसेनेच्याच दोन जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट असून याच गटबाजीतून किणीकर हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वत: आमदार किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मा,त्र याबाबत अद्याप आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि पोलीस या दोघांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तर या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

हत्येचा कट रचणार्‍या दोघांना अटक, तर दोघे फरार; गुन्हे शाखेची कारवाई
अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अंबरनाथ शहरातून दोघांना ठाण्यातील गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आलंय. तर या हत्येचा कटातील दोन जण फरार झाले आहेत. पोलीस पथक त्याच्या शोधासाठी दिल्लीत दाखल झाले असून, लवकरच दोन्ही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मात्र अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे पोलिसांनी गुप्त ठेवलीत.