डॉ.अतुल शिवाजी पाटील (बालरोगतज्ञ)
मातोश्री चाईल्ड क्लिनिक शिरोळ
मोबा – 8180914599
शिरोळ :
सध्या शिरोळ आणि परिसरामध्ये लहान मुलांच्यात गालफुगी या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. ग्रामीण भाषेत याला गालगुंड असेही म्हणतात. या आजारात प्रामुख्याने आपल्या शरीरातील लाळग्रंथीला ( Parotid Glands) सुज येते. सदरच्या आजाराची साथ मुख्यत्वे शिशिर व वसंत ऋतू मध्ये येते. गालगुंड, गालफुगी रोग ५ ते १५ वर्षे वयाच्या मुलांमधे अधिक प्रमाणात आढळतो. परंतु कुठल्याही वयांमधे याची लागणं होऊ शकते. बालकांपेक्षा प्रौढ व्यक्तीमधे व्याधीची गंभीर लक्षणे निर्माण होतात. ९ महिण्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना हा व्याधी सहसा होत नाही.स्त्रियाच्या तुलनेने पुरुषामधे गालगुंड, गालफुगी रोग अधिक प्रमाणात होतो. एकदा हा व्याधी होऊन गेल्यानंतर सहसा पुनः होत नाही. कारण त्या रोग्याच्या शरीरात ह्या व्याधीविरुद्ध प्रतिकार शक्ति निर्माण होते. गालफुगी हा आजार संसर्गजन्य असलेने मोठया शहरामधे हा व्याधी जास्त प्रमाणात पसरतो. शाळेत जाणाऱ्या मुलांच्यामध्ये हा आजार झपाट्याने पसरतो. पूर्वी हा आजार सामान्यपणे सर्वत्र आढळत होता परंतु सध्या त्यावरील लसीकरण उपलब्ध असलेने त्यांची साथ कमी प्रमाणात दिसून येते.
गालगुंड रोगाचा संचयकाळ म्हणजे गालगुंड रोगाच्या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यापासून ते गालगुंड रोगाची लक्षणे निर्माण होईपर्यंतचा कालावधी हा 18 दिवसांचा असतो. गालफुगी, गालगुंड कारणीभूत घटक – आर. एन. ए. मिक्झोव्हायरस पॅरॉटायडिटीज ( RNA Myxovirus – Parotiditis ) ह्या विषाणुची लागणंं झाल्यामुळे गालफुगी, गालगुंड व्याधी होतो.पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या लाळेमधील विषाणूमुळे गालगुंड होतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकल्यामधून याचा प्रसार होतो. एकदा व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली म्हणजे बारा ते पंधरा दिवसाने गालगुंडाची लक्षणे दिसतात. संसर्गाची प्राथमिक लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूक न लागणे आणि निरुत्साह अशी लक्षणें आढळून येतात. लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा ते चोवीस तासात गालगुंड झाल्याचे आढळते. अन्न चावण्यास आणि गिळण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात आंबट पदार्थ गिळताना अधिक त्रास होतो. ताप ४० सें (१०४ फॅ) पर्यंत असतो. दुसऱ्या दिवशी गालाची सूज वाढते. सातव्या दिवशी सूज पूर्णपणे उतरते. एकदा गालगुंड झाले म्हणजे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परत गालगुंडाचा त्रास होत नाही.बहुतेक रुग्णामध्ये होणारा आजार गुंतागुंतीशिवाय बरा होतो. आजार मोठ्या व्यक्तीस झाला म्हणजे गुंतागुंत होण्याची शक्यता असते. १५% रुग्णामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचा दाह- मेनेंजायटिस होतो. गालफुगी, गालगुंड व्याधीचा प्रसार प्रत्यक्ष संपर्क, तुषार संसर्ग, रुग्णांनी वापरलेल्या वस्तु इतरांंनी वापरल्यामुळे तसेच रोग्याच्या लाळेमुळे होतो. गालफुगी, गालगुंड व्याधीचा प्रसार नाकातील स्राव, शिंकणे, खोकणे, श्वासाद्वारे होतो. गालगुंडाचा संसर्ग मेंदूमध्ये पसरल्यानंतर मेंदूआवरण दाह होतो. गालगुंड मेंदूदाहामध्ये डोकेदुखी ; तीव्र ताप तसेच आकडी / फिट्स येणे अशी लक्षणें आढळून येतात. मेंदूदाह गालगुंड होऊन दोन आठवड्यांनी होतो. गालगुंडानंतर झालेला मेंदूदाह बहुघा पूर्णपणे बरा होतो. दर शंभर रुग्णापैकी एका रुग्ण गालगुंड आजारात गुंतागुंतीमुळे मृत्यू पावतो.
वयात आलेल्या एक चतुर्थांश पुरुषामध्ये अंडकोशामध्ये गालफुगीची लक्षणे दिसतात. अंडकोशास आलेली सूज हे त्याचे लक्षण आहे. गालगुंड झाल्यानंतर सात दिवसात ही अवस्था सुरू होते. एका किंवा दोन्ही अंडकोशास आलेली सूज, तीव्र वेदना, ताप, मळमळ आणि डोकेदुखी सुरू होते.वेदना आणि सूज पाच ते सात दिवसात कमी होते पण अंडकोश कित्येक आठवडे संवेदनक्षम राहतात. कधीकधी मुलींना बीजांड दाह होतो पण त्याची लक्षणे पुरुषांपेक्षा कमी असतात.
गालफुगीमध्ये एका बाजुला किंवा दोन्ही बाजुला लाळग्रंथीमधे शोथ व वेदना, कर्णमूलशूल, डोकेदुखी, मानदुखी इ लक्षणे निर्माण होतात. ताप १०१ ते १०२ डिग्री फॅरेनहिट, पर्यंंत ताप येतो. गालावर व कानाच्या मुळाजवळ सूज असल्यामुळे येथील त्वचा ताणली जाते. त्यामुळे तोंड उघडतेवेळी त्रास होतो. गालफुगी, गालगुंड रोगामधे काही रुग्णांमध्ये उपद्रव स्वरूपात वृषणग्रंथीवर दाह व सुज येणे ( Orchitis ), स्त्रीबिजांंडावर सुज व दाह (Ovaritis), अग्न्याशयावर सुज व दाह (Pancreatitis), ह्रदयाच्या पेशीवर सुज व दाह Myocarditis इ लक्षणे निर्माण होतात.
गिळण्यास त्रास होत असल्याने रुग्णास अन्न आणि पाणी पुरेशा प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. रुग्णास मऊ व खाण्यास सोपे पदार्थ द्यावेत.शिजवलेला मऊ भात, उकडलेले बटाटे, सूप, खीर मिक्सरमधून काढलेली लापशी असे पदार्थ द्यावेत. वेदना कमी होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्याने वेदनाशामक औषध घ्यावेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गालफुगी, गालगुंड रोग्याच्या लाळग्रंथीला सूज आल्यापासून ५ दिवसपर्यत रुग्ण हा अतिसंक्रामक असतो त्यामुळे गालफुगी, गालगुंडच्या रुग्णाला ५ दिवसपर्यत इतर निरोगी व्यक्तींपासून वेगळे ठेवावे. तसेच गालगुंड लसीकरण – एम. एम. आर. ( MMR ) ही लस गालफुगी, गालगुंड किंवा Mumps ह्या व्याधीसाठी दिली जाते.