Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

देशातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात भक्कम पर्याय म्हणून उभ्या राहिलेल्या घ्ऱ्ऊघ्अ आघाडीतून एकामागोमाग एक पक्ष बाहेर पडताना दिसत आहेत. आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसनंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)सुद्धा या आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गट आघाडीतून बाहेर पडल्यास देश पातळीसह राज्यातील समीकरणांमध्येही मोठा बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीतून आम आदमी पक्षाने बाहेर पडत असल्याचे सांगितले होते. तर, तृणमूल काँग्रेसही फार उत्साही असल्याचे चित्र नाही. अशातच आता इंडिया आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गटही इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (ठाकरे गट) सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर घ्ऱ्ऊघ्अ आघाडीचे मानेवरील जोखड झटकण्याच्या तयारीत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी झालेले हालचालींचे पडसाद आता स्पष्ट होत असून आगामी विधानसभेसाठी राज्यात नवे समीकरण उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याची राजकीय शक्यता सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. युती झाल्यास राज्यात एक सक्षम आणि प्रभावी राजकीय पर्याय उभा राहू शकतो, असा विश्वास या गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. मराठीच्या मुद्यावर दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यानंतर वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत.

उद्धव ठाकरे यांना घ्ऱ्ऊघ्अ आघाडीत काँग्रेससोबत चालावं लागतंय, तर राज ठाकरे यांची परप्रांतीय विरोधी भूमिका जगजाहीर आहे. त्यामुळे राज्यात परस्परविरोधी भूमिका असलेल्या आघाडीसोबत चालण्याऐवजी ठाकरे बंधू हे एका समान मुद्यावर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नव्या आघाडीमुळे बदलणार राजकीय गणित?

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांची युती झाली, तर भाजप-शिंदे गटासमोर एक नवा आव्हान उभा राहील. मराठी अस्मिता, भूमिपुत्रांचे प्रश्न, रोजगार आणि शहरी मतदारांमध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी दोघंही पक्ष सज्ज आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्याआधी उद्धव यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर भाष्य केले. युतीचा निर्णय घेण्यास आम्ही दोघे सक्षम असून तिसऱ्यांची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.