घटनेनंतर बसमधून प्रवास करताना शेजारची मुलगी पाहत होती राजा रघुवंशी हत्येच्या बातम्या, सोनम तिला ओरडली अन्…
इंदूर / महान कार्य वृत्तसेवा
इंदूर येथून मेघालयमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या आणि तिथेच खून झालेल्या राजा रघुवंशी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पत्नी सोनम रघुवंशीनेच पतीच्या हत्येचा कट रचल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतंच, पण आता तिच्या हत्येनंतरच्या हालचालींबाबतही नव्या गोष्टी समोर येत आहेत. आधी असं समजलं जात होतं की, पती राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर सोनमने राजनेच मागवलेल्या टॅक्सीने उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये पोहोचली. पण आता समोर आलंय की, सोनम गाझीपूरला बसने गेली होती, याबाबतचा दावा उजाला नावाच्या एका बसमधील सहप्रवासी मुलीने केला आहे. उजाला हिने 8 जून रोजी वाराणसीहून गाझीपूरसाठी बस पकडली होती. याच बसमध्ये सोनम तिच्याजवळील सीटवर बसली होती. सोनमने चेहरा पूर्णपणे झाकलेला होता, त्यामुळे सुरुवातीला उजालाला तिची ओळख पटली नव्हती.
राजाच्या आईचा भावनिक व्हिडिओ पाहत होती
उजालाने सांगितले की, बसमध्ये असताना ती इन्स्टाग्रामवर राजाच्या आईचा भावनिक व्हिडिओ पाहत होती. हे पाहून सोनमने तिला ”अशा फालतू गोष्टी पाहू नकोस” असं ओरडून बजावलं होतं. यावरून सोनम ओळख उघड होईल याची धास्ती घेत होती, असा संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, 23 मे रोजी राजा आणि सोनम शिलॉन्गमध्ये गायब झाले होते. 2 जून रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील एका दरीत राजाचा मृतदेह आढळला. त्यानंतर 9 जूनला सोनम गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडली. तिने तिथून कुटुंबीयांना फोन करून माहिती दिली.
पोलिस तपासात समोर आलं आहे की, सोनमने तिच्या 5 वर्षांनी लहान प्रियकर राज कुशवाहा याच्यासोबत मिळून खूनाची योजना आखली होती. सोनमने आपल्या पतीचा खून राजाच्या नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने करवून घेतला. आकाश, विशाल आणि आनंद या तिघांमध्ये एक जण राजाचा चुलतभाऊ आणि दोघे मित्र होते. हे तिघं राजाला एका दरीजवळ घेऊन गेले आणि त्याचा खून करून मृतदेह दरीत फेकून दिला.
इंदूरची सोनम आणि राजा रघुवंशीची थरारक घटना
इंदूर शहरात नुकतंच विवाहबंधनात अडकलेल्या नवविवाहित जोडप्याच्या हनिमूनच्या ट्रिपचा शेवट अत्यंत भयावह ठरला आहे. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह 11 मे रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर 20 मे रोजी हे दोघंही हनिमूनसाठी मेघालयातील शिलॉन्ग येथे गेले. मात्र 23 मेपासून दोघांचाही त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क तुटला होता, ज्यामुळे अपहरणाची शक्यता व्यक्त केली जात होती. दोन आठवड्यांच्या शोधानंतर, 2 जून रोजी शिलॉन्गमधील एका दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सोनमच्या अपहरणाची चर्चा जोरात सुरू झाली. मात्र 9 जून रोजी सोनम स्वत:च पोलिसांसमोर हजर झाली आणि प्राथमिक चौकशीतच एक धक्कादायक सत्य उघड झालं. पोलिस तपासात समोर आलं की, राजाच्या हत्येचा कट सोनमनेच रचला होता. नेमका खून कशा कारणाने झाला, यामागे आर्थिक व व्यक्तिगत कारणं होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.
