मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. या पाठोपाठ नागपूरमध्ये देखील एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना महामारीचा एकदा चटका बसल्यानं आता प्रशासन अलर्टमोडवर आलं आहे. महाराष्ट्रासह मराठवाड्यात शासकीय जिल्हा रुग्णालयांमध्ये बेडच्या संख्या राखीव ठेवण्यात येत आहेत. तर खबरदारी म्हणून औषधांचा साठा तयार ठेवण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 25 बेड आयसीयू तर 50 जनरल बेड आरक्षित करण्यात आले आहेत.तशी व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली असून या रोगाच्या बातमीवर तपासण्या करण्याच्या सूचनाही सर्व डॉक्टरांना दिले आहेत.
राज्यात खबरदारी म्हणून सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विशेष पूर्वतयारी करण्यात आली आहे. रुग्णालयात काही बेड राखीव ठेवण्यात आले असून स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे.राज्य शासनाने वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली असून सर्व शासकीय रुग्णालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांत यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. रुग्णालयांमध्ये किमान तीन महिने पुरेल इतका औषधांचा साठा ठेवण्यात आला आहे. हा आजार घातक नसल्याचे स्पष्ट करत, सर्दी, पडसे किंवा खोकला दीर्घकाळ असल्यास तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी केले आहे.
जिल्हा रुग्णालयात बेडची संख्या वाढवली
हिंगोली जिल्ह्यात एचएमपीव्ही या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 25 आयसीयू बेड आणि 50 जनरल बेड आरक्षित करण्यात आले आहेत.जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस यांनी रुग्णालयातील तयार केलेल्या वॉर्डचा आढावा घेतला असून, या रोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यासह जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात या रोगावर आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय करावं?
- खोकताना किंवा िशंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
- साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करणं टाळावं? - खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसगर् लगेच पसरतो.
- टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
- आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.