Spread the love

छत्रपती संभाजीनगर 6 मे

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कुणाला चित्र काढण्याचा तर कोणाला कविता लेखनाचा छंद असतो आणि प्रत्येकजण आवड जपण्याचा प्रयत्न हा करत असतो. असाच एक छंद छत्रपती संभाजीनगर शहरातील सुनील उबाळे यांना देखील आहे. त्यांना कविता लिखाणाचा छंद आहे. आणि त्यांच्या घरावरती सर्वत्र कवींची नावेही काढलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला कवितांचे घर म्हणून ओळखले जाते.

कशी मिळाली ओळख?

सुनील उबाळे हे मूळचे छत्रपती संभाजीनगर शहरातील आहेत. सुनील उबाळे लोकांच्या घरांना रंग देण्याचे काम करतात. सुनील उबाळे सांगतात की, मला लहानपणापासूनच कवितांची आवड आहे. मी शाळेत असल्यापासून कविता करायचो. पण, वडील गेल्यानंतर घरातली सगळी जबाबदारी माझ्यावरती पडली आणि यामुळे मला शाळा सोडावी लागली आणि काम करावे लागले. पण, शाळा सोडावी लागली तरी देखील मी कविता करत होतो.

सुनील उबाळे सांगतात की, आमच्या घरची परिस्थिती ही अत्यंत नाजूक होती. आम्हाला एक वेळचं जेवण मिळणेसुद्धा अवघड होते. ज्या दिवशी जेवायला भाकरी मिळायची ती भाकरी आम्ही आमच्या उषाखाली म्हणजेच आंथारूनामध्ये लपवून ठेवायचो. आणि ज्या दिवशी आम्हाला जेवायला भेटणार नाही त्या दिवशी ती वाळलेली भाकरी अम्ही भावंडं खायचो. या आमच्या परिस्थिवर मी एक कविता केली होती. ती कविता संपूर्ण महाराष्ट्रभर खूप प्रसिद्ध झाली. तेव्हापासून मला ही ओळख भेटली.

सुनील उबाळे यांच्या घराच्या भिंतीवरती पहिल्या कविता लिहिलेल्या होत्या आणि तेव्हापासून त्यांच्या घराची ओळख ही कवितांचे घर म्हणून झाली. पण, त्यांच्या शेजाऱ्यांनी जेव्हा घराचे बांधकाम काढले तेव्हा त्यांच्या घराची भिंत पडली म्हणून त्यांना नवीन भिंतही बांधावी लागली. पण, त्यांना आता यावेळेस कविता न लिहिता वेगळे काहीतरी करायचे होते. त्यांना कल्पना आली की आपण घराच्या छतावरती महाराष्ट्रातील कवींची नावे टाकावी असे त्यांनी ठरवले. पण, त्यांच्या घरावरती पत्रे होते. त्यावर नाव टाकणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पीओपी केली आणि त्यावरती संपूर्ण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि कवियत्री यांची नावे टाकली आहेत.

माझ्या घरी ज्या कवीची नावे लिहिलेली आहेत ते कवी येऊन गेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या नावाबरोबर सेल्फी देखील काढलेला आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्यासोबत माझे संपूर्ण कुटुंब उभे होते. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिलेली आहे आणि त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे, असेही सुनील उबाळे यांनी सांगितले.